संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील डोलनर वस्तीवरील विहिरीत एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवार दि. २ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र सदर महिलेची ओळख पटली आहे. जिजाबाई काशिनाथ जाधव (वय ४०) रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर असे या महिलेचे नाव आहे.
नेमकं काय घडल
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मांडवे बुद्रुक शिवारातील डोलनर वस्तीवर भिका डोलनर यांच्या शेतात विहीर आहे. मात्र या विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घारगाव पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, महादेव हांडे, सुरेश शेळके, चंद्रकांत मेढे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी बाजाच्या साहाय्याने संबंधित महिलेचा मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला.
यावेळी पोलिसांनी संबंधित विवाहीत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र सदर महिला या परिसरातील नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अवघ्या काही तासांतच सदर महिलेची ओळख पटली आहे. पारनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जिजाबाई काशिनाथ जाधव ही महिला रहिवासी आहे. त्यामुळे घारगाव पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवली असून सदर महिला विहिरीत कशी पडली? आत्महत्या केली का घातपात आहे? याचा तपास घारगाव पोलिस करत आहेत. त्यामुळे यामागील कारण आता समोर येणार आहे.
