नैऋत्य मान्सून अद्यापही थांबलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 15 ते 20 जून दरम्यान मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी दिली. यावर्षीच्या मान्सुनची अडथळ्यांची शर्यत थांबता थांबेना. एल- निनो, एम. जे. ओ. आणि हिंदी महासागरातील द्विधृव स्थिती या मान्सुनवर परीणाम करणार्या घटकांच्या प्रतिकुलतेमुळे हवामान खात्याने तसेच अन्य अधिकृत स्रोतांनी सुरवातीला वर्तवलेले अंदाज प्रत्यक्षात दिसले नाहीत.
एल-निनो जुनमध्येच सक्रिय झाला असुन निनो 3.4 भागातील पॅसिफिक महासागरातील तापमान 0.5 अंश सेल्सिअस या एल निनो निर्मितीच्या सिमारेषेपर्यंत पोहचले आहे. एम. जे. ओ. सध्या 7 फेजमध्ये म्हणजे पश्चिम पॅसिफिक मध्ये असल्याने त्याचा जुन मध्ये लाभ होणे शक्य नाही. हिंदी महासागरातील द्विधृव स्थिती सध्या तटस्थ असुन पावसाळ्याच्या उत्तरार्धात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तो सकारात्मक होईल. परंतु तोपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस संपत आलेला असतो.
अहिल्यानगरला नियमीत मान्सून त्याच्या संभ्याव्य गतीनुसार 15 ते 20 जुनच्या दरम्यान सुरु होईल. जूनच्या 15 तारखेपर्यंत स्थानिक पातळीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व कमी वेळ टिकणारा धुंवाधार पाऊस पडेल. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत शेतीसाठी उपयुक्त अशा मोठ्या पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. अवकाळी पावसावर शेतीची मशागतीची कामे करता येतील. परंतु जोपर्यंत 75 ते 100 मिमी चांगला पाऊस पडत नाही आणि जमिनीमध्ये 5 ते 6 इंच खोलीपर्यंत ओलावा जात नाही, तोपर्यंत खरिपाची पेरणी करू नये.
