महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (११ मे) सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्या आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नसली पाहिजे. आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. मंत्रिमंडळात माझी वर्णी कधी लागणार, हे सांगता येत नाही.
पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यावरुन २१ ते २२ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.
तसेच, मंत्रिमंडळ विस्तार हा आमच्यासाठी नव्हे तर जनतेसाठी महत्त्वाचा आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच-सहा खाती आहेत. त्यामुळे कारभार सांभाळताना अडचणी येतात.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा गरजेचा आहे. आता कोणालाही मंत्री करा, पण मंत्रिमंडळ विस्तार होणे महत्त्वाचे आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर तो २०२४ नंतरच होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
