कॉंग्रेसला रामराम ठोकणाऱ्या 8 पक्षबदलूंचा पराभव

बंगळुरू – कर्नाटकमध्ये 2019 या वर्षात झालेल्या राजकीय बंडामुळे भाजपच्या सत्तेचा मार्ग सुकर झाला. त्या बंडाचा भाग असणाऱ्या आणि कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या 8 पक्षबदलूंना यावेळी पराभवाचा झटका बसला.

कर्नाटकमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत (वर्ष 2018) त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यानंतर कॉंग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी करून आघाडी सरकार स्थापन केले. जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील ते सरकार 14 महिन्यांनी कोसळले.

त्यासाठी कॉंग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी दिलेले राजीनामे कारणीभूत ठरले. त्या बहुतांश बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेश करत पोटनिवडणुका जिंकल्या. नंतर भाजप सरकारमध्ये त्यातील अनेक जण मंत्रीही बनले.

मात्र, कॉंग्रेसला रामराम ठोकणाऱ्या 8 पक्षबदलूंना यावेळी पराभव पत्करावा लागला आहे. त्यामध्ये प्रतापगौडा पाटील, बी. सी. पाटील, के. सुधाकर, एम. टी. बी. नागराज, श्रीमंत पाटील, महेश कुमथल्ली, के. सी. नारायण गौडा आणि आर. शंकर यांचा समावेश आहे.

Leave a Comment