अहिल्यानगर : भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, मेघगर्जना आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना वादळी वातावरणात झाडाखाली किंवा उघड्यावर न थांबणे, विजांच्या कडकडाटावेळी विद्युत उपकरणांचा वापर टाळणे, धातूच्या वस्तूंपासून दूर राहणे, सुरक्षित इमारतीत आश्रय घेणे तसेच पर्यटनस्थळे, धरणे, नद्या व ओढ्यांजवळ सेल्फी किंवा अनावश्यक गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे व शेतमालाची सुरक्षित साठवणूक करावी, तर जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
