पर्यावरणप्रेमी स्व. अशोकराव पा. खेमनर यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त पवित्र स्मृतींना अभिवादन

संगमनेर (DSNews24/किरण पुरी)  स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत संगमनेर तालुक्यातील साकूर येथील चितळकरवस्ती येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणप्रेमी अशोकराव पाटील खेमनर यांच्या कार्याला अभिवादन म्हणून विद्याप्रबोधिनी प्रशालेतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम आयोजित केला जात असून, यावर्षी चितळकरवस्तीची निवड करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्याप्रबोधिनी प्रशालेत स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या हस्ते चितळकरवस्ती येथे विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच भावी पिढीमध्ये निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, सुभाष शेंडगे, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, दिनकरराव भगत, आबासाहेब वराळे, विश्वास टेकुडे, रमेश पेंडभाजे, योगेश वराळे, बाळासाहेब वराळे, साहेबराव वराळे, गवराम वराळे, विठ्ठल वराळे, सोपान वराळे, शरद वराळे, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करत, प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्याप्रबोधिनी प्रशालेचा हा सातत्यपूर्ण उपक्रम पर्यावरण संरक्षणास चालना देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, निसर्गप्रेम आणि स्मृतिदिन विधायक पद्धतीने साजरा करण्याची प्रेरणा निर्माण करणारा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment