बिग ब्रेकिंग! सभापती शंकरराव खेमनर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात? ; साकूरला पुन्हा प्रतिनिधित्व..

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) आशिया खंडातील नावाजलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील आजी – माजी खासदार व आमदार उतरण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर यांच्यानंतर शंकरराव खेमनर यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय व सहकार क्षेत्रात रंगू लागली आहे. इतर मागास प्रवर्ग (OBC) किंवा विमुक्त जाती-भटक्या जमाती (NT) प्रवर्गातून ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साकूरला पुन्हा जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शंकरराव खेमनर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जातात. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी साकूर गटात आपले मजबूत संघटन उभे केले असून अनेक सहकारी संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवासह ते मागील काही वर्षांपासून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना जिल्हा बँकेवर संधी मिळू शकते, अशी चर्चा संगमनेर, पारनेर आणि पठार भागात सुरू आहे.

यापूर्वी जवळपास दोन दशके बाजीराव पा. खेमनर यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. तसेच २०११ ते २०१५ या कालावधीत त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषवून यशस्वी कारभार केला होता. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आजही दखल घेतली जाते.

याच पार्श्वभूमीवर १८ जुलै रोजी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बाजीराव पा. खेमनर यांची बंद दाराआड भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. या भेटीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ७३२ ठराव नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये १३५ विविध सहकारी विकास संस्था, ३०८ शेतीपूरक संस्था आणि २९० बिगरशेती संस्थांचे ठराव समाविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत संगमनेर तालुक्याची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Comment