दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सुर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हा एकनाथ शिंदे यांना बहाला केल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्धच्या आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
मागच्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाजून युक्तिवाद केला होता. त्यानंतर न्यायालयानं ४ ऑगस्ट रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवलं होतं. त्यानुसार आज सुनावणी होणार आहे. पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल. जर चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असं वक्तव्य ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत केलं होतं. त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होणार? याकडे लक्ष लागलं आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वतीने या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी सरन्यायाधीशांनी न्यायालयाबाबत सार्वजनिकरीत्या बेजबाबदार विधाने होऊ नयेत, अशी नाराजी व्यक्त केली होती.
आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंकडून महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे मांडले जाण्याची शक्यता असून, पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि संबंधित घटनात्मक प्रश्नांवर सविस्तर युक्तिवाद होण्याची अपेक्षा आहे. या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करू शकतो. सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, न्यायालयात नेमकं काय घडतंय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
