कोल्हापूर – राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, पुढील दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असून, यासाठी राज्य सरकार तब्बल ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. पहिल्या टप्प्यात लहान शेतकऱ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत १२ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम वर्ग केली जाणार आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्या तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले. कर्जमाफीची रक्कम कमी जमा झाली तरी उर्वरित रक्कम संबंधित बँका माफ करतील. तसेच कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना ‘थकबाकी नाही’ (नील) दाखला उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या आणखी तीन याद्या प्रसिद्ध होणार असल्याने पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे भावनिक आवाहनही दत्तात्रय भरणे यांनी केले.
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या या योजनेचा लाभ लागू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या संदर्भात उद्या उच्चस्तरीय बैठक होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर मदत देण्याचा सरकारचा विचार असून, सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर नियमित कर्जदारांचाही सकारात्मक विचार केला जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
