संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या अनेक दिवसांपासून आयुष्याशी झुंज देत संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात भटकंती करणाऱ्या एका अज्ञात मनोरुग्ण बेवारस महिलेला अखेर सुरक्षित आश्रय मिळाला आहे. साकूर ग्रामपंचायतीने दाखविलेल्या तत्परतेमुळे या असहाय महिलेची त्रासातून सुटका झाली असून, तिला अहिल्यानगर येथील माऊली सेवाभावी प्रतिष्ठानमध्ये दाखल करण्यात आले आहे.
साकूर ग्रामपंचायत हद्दीत ही महिला अनेक दिवसांपासून भटकंती करत होती. उदरनिर्वाहासाठी ती नागरिकांकडे हात पसरून मदतीची याचना करत होती. कधी बसस्थानक, कधी बाजारतळ तर कधी मंदिर परिसरात आश्रय घेत ती आपले दिवस काढत होती. मात्र तिच्या मनोरुग्ण अवस्थेचा गैरफायदा घेत काही दारुडे व टवाळखोरांकडून तिला वारंवार त्रास दिला जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
वाढत्या त्रासामुळे ही महिला गावातील सुनसान असलेल्या सरकारवाडा परिसरात जाऊन राहत असल्याचेही समोर आले. असहाय महिलेची ही अवस्था पाहून ग्रामस्थांनी तिला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी केली.
याबाबतची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा साकूरचे उपसरपंच शंकरराव खेमनर आणि सरपंच सचिन सोनवणे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने हालचाली सुरू केल्या.
ग्रामपंचायतीने आशा सेविकांच्या माध्यमातून महिलेची प्राथमिक चौकशी केली. मात्र मनोरुग्ण अवस्थेमुळे ती स्वतःचे नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती देऊ शकत नव्हती. त्यामुळे तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने क्षणाचाही विलंब न करता अहिल्यानगर येथील माऊली सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने साकूर येथे येऊन आशा सेविकांच्या सहकार्याने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर संबंधित महिलेला ताब्यात घेऊन माऊली सेवाभावी प्रतिष्ठानमध्ये सुरक्षितपणे दाखल करण्यात आले.
अनेक दिवसांपासून रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी असुरक्षित अवस्थेत जीवन जगणाऱ्या या असहाय महिलेला अखेर निवारा आणि मायेचा आधार मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
असहाय व निराधार महिलेला वेळेत सुरक्षित निवारा मिळवून देत साकूर ग्रामपंचायतीने दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
