नाशिक/संगमनेर(DSNews24) नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्या मूळ आराखड्यानुसारच करण्यात यावा, या मागणीसाठी आज क्रांती दिनाचे औचित्य साधत आंदोलन करण्यात आले. नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले तसेच पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि चाकण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. विविध ठिकाणी चक्काजाम आणि रास्तारोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
समृद्धी महामार्गावरही काही ठिकाणी आंदोलकांनी वाहतूक रोखली. आंदोलनात आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. सत्यजित तांबे आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आमदारांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, पोलिसांचे वाहन अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आंदोलकांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनामुळे नाशिक-पुणे मार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
खेड-मंचर-नारायणगाव मार्गाची मागणी
पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग खेड, मंचर, नारायणगाव या भागातूनच झाला पाहिजे, अशी भूमिका पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने घेतली आहे. या मागणीसाठी चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
चाकण येथील तळेगाव चौकातील पुणे-नाशिक महामार्गावरही मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले. रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या निर्णयाला विरोध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संवाद
आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेचा मार्ग पूर्वीच्या मागणीनुसारच झाला पाहिजे, या भूमिकेवर तांबे ठाम राहिले.
यावेळी बोलताना सत्यजित तांबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. नाशिक आणि पुणे ही शहरे जवळ आणण्याच्या उद्देशाने तसेच मार्गावरील गावांच्या विकासासाठी रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू झाला होता. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून रेल्वे होणार असल्याचेच ऐकायला मिळत असल्याची टीका त्यांनी केली.
भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे देण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास शासनाकडे त्यासाठी निधी कुठून येणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या वेळी जमीन घेण्यासाठी प्रक्रिया चांगली होती, रेल्वे स्टेशनच्या टेंडरसाठी प्रक्रिया चांगली होती, मग आता नेमके काय झाले? असा सवाल तांबे यांनी केला.
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असून नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग मूळ आराखड्यानुसारच करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. संगमनेरसह विविध भागांतही आंदोलन सुरू असून, या आंदोलनामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
