सत्यजीत तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच बाळासाहेब थोरात संतापले

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्वीच्या मूळ आराखड्यानुसारच करण्यात यावा, या मागणीसाठी आज पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व जयश्री थोरात यांच्यासह संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

दरम्यान, नाशिक येथे झालेल्या आंदोलनात आमदार सत्यजीत तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या कारवाईचे पडसाद संगमनेरमध्येही उमटले.

सत्यजीत तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला. “अटकेला घाबरणारे आम्ही नाही. आमचा वारसा स्वातंत्र्यसैनिकाचा आहे,” असे म्हणत थोरात यांनी सरकार आणि प्रशासनाला सूचक इशारा दिला.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या निर्णयामुळे नाशिक, संगमनेर, सिन्नर, अकोले, जुन्नर, मंचर परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. मूळ आराखड्यानुसारच रेल्वे मार्ग व्हावा, या मागणीसाठी नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे.

हिवरगाव पावसा टोलनाक्यावर झालेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे प्रकल्पाच्या मागणीसाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून ‘मूळ मार्गानेच रेल्वे झाली पाहिजे’ अशी जोरदार मागणी केली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या तापला असून, आगामी काळात या प्रश्नावर सरकारविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment