राजकारणात खळबळ! कॉंग्रेस नेत्यासह मुलाची निर्घृण हत्या 

नादिया : पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ स्थानिक नेते आणि त्यांच्या २४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिसुर रहमान आणि त्यांचा मुलगा अबू सुफियान अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे नादिया जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना नक्काईपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेथुआडाहरी रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनिसुर रहमान आणि त्यांचा मुलगा अबू सुफियान हे कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारला घेरले आणि अचानक गोळीबार केला.

गोळीबारानंतर हल्लेखोरांनी वाहन थांबवून कारमध्ये अडकलेल्या बाप-लेकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दोघांचाही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलेले असतानाच झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार आशिष बॅनर्जी यांचा पक्ष कार्यालयात मृतदेह आढळल्याने राज्यात चर्चा रंगली होती. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि त्यांच्या मुलाची हत्या झाल्याने राजकीय संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नक्काईपारा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हत्येचा तपास सुरू केला आहे. या दुहेरी हत्याकांडामागे कोणाचा हात आहे, हत्येचे नेमके कारण काय आणि या घटनेचा राजकीय संबंध आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Comment