शिंदे गटाच्या आमदाराने मोठा दावा केला आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे पुढच्या काही वर्षात मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा शिंदे गटाच्याच आमदाराने केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी नेमक्या कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“गेल्या 25 वर्षात आमदार, जिल्हाप्रमुख, उपनेते, नेते, राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री असा गुलाबराव पाटील यांचा प्रवास मी पाहतोय. उद्या कदाचित गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री होतील की काय याचं मनावर दडपण आहे”, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी केलंय.
गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं तर त्यांच्यासह माझेही पाय कापायला सुरुवात होईल, असेही सूचक वक्तव्य किशोर पाटील यांनी यावेळी केलं.
किशोर आप्पा पाटील नेमकं काय म्हणाले?
“गेल्या 20-25 वर्षांपासून आपण पाहतोय. आम्हाला शिवतीर्थानंतर या जळगाव जिल्ह्यात कोणती पर्वणी असेल तर तो 5 जूनचा गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस. हा दिवस आमच्या मनामध्ये अगदी ठासून भरलेला आहे. त्याचं चित्र आज आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे.
मी तुमचे मनापासून आभार मानतो, गुलाबरावांना शुभेच्छा देतोय. मी गुलाबराव पाटील आमदार असताना इथे आलेलो आहे, ते जिल्हाप्रमुख असताना आलेलो आहे, उपनेते, नेते असताना आलेलो आहे, आज माझं भाग्य आहे की, गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री असताना मी त्यांच्या वाढदिवसाला आलेलो आहे”, असं किशोर आप्पा पाटील म्हणाले.
“मला यापुढे शुभेच्छा देताना थोडं घाबरावं लागेल. कारण कॅबिनेट मंत्रीपदाचं पुढचं पद हे फक्त मुख्यमंत्रीपद आहे. जर ते मुख्यमंत्रीपद मी या ठिकाणी जाहीर केलं तर तिकडून सगळ्यांनी मिळून त्यांच्यासहीत माझे पाय कापायला सुरुवात होणार आहे”, असं किशोर आप्पा म्हणाले.
