राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यांतील वाद जळगाव जिल्ह्यात नाही तर राज्यात चर्चेत असतो.
दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात. एकनाथ खडसे यांनी एका प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. त्या प्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड केला आहे.
काय आहे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्यात सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरु आहे. पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते.
गुलाबराव पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने 500 रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही दिली, अशी माहिती एकनाथ खडसे यांचे वकील भूषण देव यांनी दिली.
