मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधल्या शाब्दिक चकमका काही नवीन नाहीत. ठाकरे गट आणि शिंदे गट ह शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांवर नेहमीच कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच शिंदे गटाच्या नेत्याकडून एक सूचक ट्वीट करण्यात आले आहे. या ट्विटमुळे राजकीय तर्क-वितर्कांना चांगलेच उधाण आले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हे ट्वीट केले असून त्यात ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावताना “आज उबाठाचा आणखी एक मोहरा कमी होईल, खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांची निष्ठा ठेवील”, असे म्हटले आहे.
त्यासोबतच, “सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, ‘उठा’ तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार”, असा टोलाही या ट्वीटमधून नरेश म्हस्केंनी लगावला आहे.
कवितेच्या स्वरूपात हे ट्वीट म्हस्केंनी केले आहे. दरम्यान, म्हस्केंच्या या ट्वीटमुळे नेमक्या कोणत्या नेत्याबद्दल त्यांनी हे ट्वीट केल आहे? याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहेत.
