राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
एवढच नाही तर आपल्याला 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्याकडून केला जात आहे.
अजित पवार सत्तेत दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यात येत आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता राजीनामा द्यावा लागेल, असंही ठाकरे गटाकडून बोललं गेलं.
ठाकरे गटाकडून करण्यात येत असलेल्या या दाव्यावर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी कोण पोहोचवतं माहिती नाही, ज्यांच्या पक्षात कुणी नाही ते अशा बातम्या देतात.
ते राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं दिवास्वप्न कोणी पाहू नये, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.
