‘शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून दोन टप्प्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
‘शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबवलेली नाही. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची पडताळणी, तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत किरण सरनाईक यांनी हा प्रश्न विचारला होता.
‘विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची ९१.४ टक्के पडताळणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर ८० टक्के पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
तोपर्यंत ५० टक्के पदे भरण्यात येणार आहेत. आधार पडताळणी, तसेच बिंदू नामावलीचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी शालेय शिक्षण आयुक्तांच्या पातळीवर दरआठवड्याला आढावा घेतला जात आहे,’ असे केसरकर म्हणाले
