अमरावती – राज्यभरात विविध ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत असून वीजा जमीनीवर पडण्याचे प्रमाण वाढत आहे.
अशाच एका घटनेत पावसात झाडाचा आसरा घेऊन थांबलेल्या काका-पुतण्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे घडली आहे. या घटनेत इतर आठ जण देखील जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरगड येथील एका शेतात शेतकरी आणि शेतमजुर शेतीचे काम करत होते. यावेळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरु झाला.
पाऊस सुरु झाल्यामुळे शेतातील सुरु असलेले काम थांबवून सर्वजण शेततील लिंबाच्या झाडाच्या आश्रयाला थांबले होते. यादरम्यान, अचानक झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत काका आणि पुतण्या अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. सुनिल मोती भास्कर (वय 32), निलेश बजरंग भास्कर (वय 20) असे मृत्यू पावलेल्या काका-पुतण्याचे नाव आहे.
या दुर्घटनेत सुनिल भास्कर यांचा जागीच मृत्यू झाला तर, निलेश भास्कर याला उपचारासाठी टेम्बुरसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच या शेतातच काम करणारे इतर आठ जण जखमी झाले आहेत.
