राज्यातील कृषी सेवकांना सहा हजार रुपये मानधन मिळत होते. त्यात दहा हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवकांना आता १६००० रुपये मानधन मिळणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
कृषी सेवक हा गावपातळीवर काम करणारा आहे. कृषी सहायकांच्या बरोबरीने सरकार आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे तसेच मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सेवक करत असतात. या कृषीसेवकांना तुटपुंज्या ६००० रुपये मानधनावर काम करावे लागत होते.
महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये कृषी सेवक पदाची निर्मिती केली. पहिल्या तीन वर्षांसाठी सुरुवातीला २५०० मानधनावर भरतीस मंजुरी दिली होती. त्यानंतर आठ वर्षांनंतर २०१२ मध्ये मानधन वाढ करून ६००० रुपये मानधन करण्यात आली होती. त्यानंतर आता ११ वर्षांनी सरकारने मानधनात दहा हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
