साकूर येथील सुनिल भुजबळ स्वातंत्र्यदिनी बसणार उपोषणाला…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील भुजबळ वस्ती येथून घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी पीक अप चोरून नेल्याची घटनेला पंधरा ते वीस दिवस उलटून गेले पोलिसांना अद्यापही पीक अपचा शोध लागला नाही.

येत्या १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत घारगाव पोलिसांनी पीक अप शोधून न दिल्यास १५ ऑगस्ट २०२३ पासून संगमनेर पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुनिल निवृत्ती भुजबळ यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र संगमनेर पोलिस उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, साकूर येथील भुजबळ वस्तीवर माझ्या कुटुंबासोबत राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. शेतीच्या कामासाठी सन २०१३ साली जुनी महिंद्रा बोलेरो पीक अप (नं. एम एच 43 ए. डी. 5367) घेतली होती. पीक अपचा वापर घरगुती शेतीचा माल व शेतकऱ्यांचा शेत माल वाहतूकीसाठी करत होतो.

दरम्यान १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या वेळी पीक अप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली आहे. तसेच अज्ञात चोरट्यांनी पीक अप चोरून नेल्याचे साकूर पासून ते श्रीरामपूर पर्यंत रस्त्याच्या लगत असलेल्या विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असताना देखील घारगाव पोलिसांनी पीक अपचा शोध लावला नाही. १० लाख रुपये किंमतीची पीक अप चोरीला गेल्याने माझी मनस्थिती ढासळत चालली आहे. घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपासी पोलिस कर्मचाऱ्यांनी या घटनेकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. श्रीरामपूर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पीक अप चोरून नेल्याचे दिसत असताना देखील पोलिसांनी शोध का लावला नाही हाच प्रश्न आहे. असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment