अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव…..

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन_आपल्या_दारी या शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा पुढचा टप्पा पार पडला. यावेळी या जिल्ह्यातील २४ लाख ४८ हजार लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटी रुपयांच्या लाभ देण्यात आला.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आजवरच्या १२ कार्यक्रमातून राज्यभरातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ही संकल्पना बदलण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली होती असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमातच ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांना ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला तसेच लोककलावंताना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनाचा लाभ देखील त्यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन एकट्या अहमदनगर जिल्ह्यातून होते. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असल्याचे यावेळी नमूद केले. समृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि परिसराच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होणार असल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसाचे सरकार असून १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहे. तसेच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून ५ लाखांपर्यंत विनामूल्य उपचार करण्याचा लाभ सरसकट सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

समुद्राला वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी शासन काम करत आहे‌. या माध्यमातून भविष्यात राज्यातील अनेक भाग दुष्काळमुक्त होणार आहेत असेही यासमयी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिवसरात्र मेहनत करून देशाला नव्या उंचीवर घेऊन जात असून जनतेचा सेवक म्हणून आपण काम करत असल्याचे ते आजही म्हणतात. गेल्या नऊ वर्षांत देशात आजवर न झालेले अनेक निर्णय घेऊन अशक्य ते शक्य त्यांनी करून दाखवले असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो लाभार्थी उपस्थित होते

Leave a Comment