खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील तर भाजपने माझ्यासारख्या सक्षम महिलेला उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपसह काँग्रेसकडूनही उमेदवारीसाठी फोन आल्याचा गौप्यस्फोट तृप्ती देसाई यांनी केलाय. शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
सुळे तीन वेळा बारामतीतून खासदार झाल्या आहेत. मला वाटलं होतं यावेळी त्या राष्ट्रवादीच्या एखाद्या कार्यकर्त्याला बारामतीतून संधी देतील, मात्र सुप्रिया सुळे स्वतःच तयारी करत आहेत.
त्यांच्या मतदार संघात अनेक कामे झालेली नाहीत, त्यामुळे लोकांना त्यांचं नेतृत्व मान्य नाही, यावेळी त्यांच्या विरोधात मी बारामतीतून लोकसभा लढवणार आहे, असा दावाच तृप्ती देसाई यांनी ठोकला आहे.
