राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, म्हणाले अंडरवेअरच रिटर्न गिफ्ट…

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून जागर यात्रा काढली.

या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. कोकणातील जनतेलाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. यावेळी, आंदोलक मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याबद्दल संताप व्यक्त केला. तसेच, मी रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, असे म्हणत राज यांनी थेट इशाराही दिला.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. राज ठाकरेंनी जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हटले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे. खरंतर मी पण पदयात्रेत सहभागी झालो असतो, पण काही महिन्यांपूर्वी माझं ऑपरेशन झालं त्यामुळे इतकं चालण्याची मला अजून परवानगी नाही.

पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून सांगायचं आहेच, असे म्हणत राज यांनी सरकारला थेट इशारा दिला. यावेळी, मुंबई-गोवा रस्त्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याचा संताप व्यक्त केला.

”परवा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, पोलीस स्टेशनमध्ये सरकारने अंडरवेअरवर बसवलं, ह्या सरकारला मला एकच सांगायचं आहे ते मग आधीचं असो की आत्ताच, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो, अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो”, अशा शब्दात राज यांनी सरकारला इशाराच दिला आहे.

Leave a Comment