राज्यात आधी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. या दोन्ही गटांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीला अजून आठ ते नऊ महिने बाकी असून येत्या काळात आता काँग्रेसमध्ये फूट पडणार आहे.
काँग्रेसचे आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाच भाजपचे माढ्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
ते मीडियाशी संवाद साधत होते. नाईक निंबाळकर यांच्या या राजकीय भूकंपाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सत्तेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार, खासदार राहूच शकत नाहीत. काँग्रेसच्या आमदार खासदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. या आमदार आणि खासदारांनी त्यांची अस्वस्थता मला खासगीत बोलून दाखवली आहे.
त्यामुळे या अस्वस्थतेतूनच काँग्रेस पक्ष फुटणार असून सध्या काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असा दावाच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
