पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
तळेगाव ढमढेरे परिसरातील तोडकरवस्ती या ठिकाणी हा अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील कविता बोरुडे (40), योगिता बोरुडे (40) आणि कारचालक राजू शिंदे (25, तिघेही रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर कारमधील किशोरी बोरुडे (17) ही मुलगी तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे आणि श्रीराम बापूराव मांडे असे तिघेजण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर असणाऱ्या तोडकर वस्ती येथे वेगात असलेले टेम्पो आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन जन गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
