शिंदे गटाचा कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मोठा धक्का 

नांदेडमधील काँग्रेसचा एक मोठा गटही शिंदे गटासोबत आला आहे. त्यामुळे नांदेडमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मंगेश कदम हे नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत.

कदम यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का समजला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळे आपण शिंदे गटात प्रवेश करत आहोत. काँग्रेस पक्षाने आपला वापर करून नंतर आपल्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागल्याचं मंगेश कदम यांनी म्हटलंय.

मंगेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी आणि नांदेडमधील माजी स्थायी समिती सदस्या ज्योती मनीष कदम, अॅड. धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

मंगेश कदम हे नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे सहा वेळा नगरसेवक होते. तर त्यांच्या पत्नी माजी समिती सदस्य होत्या.

Leave a Comment