संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील सरपंच निलम ढेंबरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एक बातमी समोर आलीय. बिरेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंचासह उपसरपंच व सर्व सदस्य सहलीवर गेले असल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान ही सहल दुसरी कुठली नसून आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला खास भेट देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आलीय. पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या काळात ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न विविध ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरला होता. त्यानंतर राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींनी पाटोदा गावाची भेट घेऊन तोच पॅटर्न आपल्या गावात राबविण्यात आलाय.
दरम्यान, पाटोदा ग्रामपंचायतीचा पॅटर्न आपल्याही गावात कसा राबविण्यात येईल यासाठी बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी निर्णय घेत आज सकाळी थेट पाटोदा गावाकडे रवाना झाले आहेत. तसेच त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक विकासकामांची माहिती घेण्यात येणार आहे.
या सहलीत माजी सरपंच निलम ढेंबरे, उपसरपंच आण्णा कढणे, सदस्य तुळशीराम गळंगे, जिजाबाई सागर, पोपट नान्नर, शितल ढेंबरे, स्वाती भोसले, शारदा सागर, पंढरीनाथ ढेंबरे, व कर्मचारी पांडुरंग ढेंबरे, संतोष सागर तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा समावेश आहे.
पुरस्कार आणि पाटोदा ग्रामपंचायतीचे समीकरण
पाटोदा ग्रामपंचायतीने आतापर्यंत विविध प्रकारच्या 24 महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरले आहे. या ग्रामपंचायतीला पहिला पुरस्कार 2007 मध्ये मिळाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या ग्रामपंचायतीने या माध्यमातून 4 कोटींची कमाई केली आहे. तर पाटोदा गावाने आतापर्यंत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, सावित्रीबाई स्वच्छ अंगणवाडी, असे अनेक पुरस्कार मिळवले आहे. पण आतापर्यंत राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीने देशपातळीवर देखील आपला झेंडा रोवला आहे.
