ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांचं आक्रमक होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करत टीका केली. या माणसाने देशाचं वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटला आता अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना मोठा इशारा दिलाय.
अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?
माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.
अण्णा हजारे यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती दिली. “आम्ही वकिलाचा सल्ला घेऊ. हे ज्याने म्हटलं, वाटोळं केलं, त्याच्यावर अब्रुनुकसान भरपाईचा दावा लावता येईल का, कुठे-कुठे लावता येईल, कसा लवता येईल याची चौकशी करुन, योग्य तो निर्णय घेऊ”, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.
