माझ्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या अजित पवार गटाला माझा पाठिंबा कसा असू शकतो ? असा प्रतिसवाल करत शरद पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. अजित पवार गटाला शरद पवार गटाला पाठिंबा असल्याच मागील काही दिवसापासून चर्चा होती.
त्यावर आता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीमुळे छगन भुजबळ निवडून आले आणि आता भाजपसोबत गेले असं म्हणत भुजबळांच्या आरोपांवरही शऱद पवारांनी भाष्य केलं.
शरद पवार यांच्या संमतीनेच आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर भाजपसोबत जाण्याचा आग्रह आमच्यातील काही लोकांचा होता.
भाजपसोबत जाऊ नये, अशी माझी भूमिका होती. तसेच सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. खोटं बोलून छगन भुजबळ शपथविधीला गेले, हे त्यांनीच कबुल केल्याचंही शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा त्यांच्या गळ्यात मीच हार घालणार, सुप्रिया सुळेंच्या विधानाबाबत शरद पवारांना विचारले असता, त्यावर ते म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार आहे. त्यांना स्विकारायचं की नाही हे जनता ठरवेल. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
