अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीमधील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.
अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर कारवाईसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे धाव घेण्यात आली आहे. मात्र या सुनावणीपूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे.
गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा शरद पवार गटात इनकमिंग सुरू झालं आहे. दोनच दिवसांपूर्वी माजी खासदार खुशालचंद्र बोपचे आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे.
माजी खासदार पिता-पुत्रासोबतच गोंदियामधील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
गोंदियामधील माजी खासदार पिता-पुत्रासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिल्यानं हा प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
गोंदियामधील आणखी काही कार्यकर्ते हे शरद पवार गटाला पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा शरद पवार गटासाठी दिलासा ठरण्याची शक्यता आहे.
