पारनेर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या (10 मार्च) पारनेर दौऱ्यावर येणार आहेत. तसेच निघोज येथे शेतकरी मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव आणि पुर्नर्जीवन समितीने विरोध दर्शवत ‘शरद पवार – गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर रात्री जवळे ते देवीभोयरे रस्त्यावर ‘शरद पवार – गो बॅक’ असे लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच या आंदोलनाला भुमिपुत्र शेतकरी संघटना, भीम आर्मी, अन्याय निर्मुलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला होता.
सामाजिक संघटनांच्या पाठींब्यामुळे आंदोलनाची धार बळकट होत असल्याचे दिसुन येताच प्रशासनाने आयोजक व आंदोलकांत मध्यस्थी करण्याची भुमिका घेतली. पवारांची याच कार्यक्रमात भेटीची वेळ द्यावी अशी आंदोलकांची मागणी होती. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी आंदोलकांची तीव्र भावना पवारांपर्यंत पोहचवण्याची हमी घेत त्यांची भेट घालून देण्याचे समितीला आश्वासन दिले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कार्यक्रमाचे आयोजक व आंदोलक यांच्यात मध्यस्थी केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कारखाना बचाव समितीने केली आहे.
आंदोलनाला पाठींबा दिलेले कार्यकर्ते कारखाना सभासद, शेतकरी, कामगार, भुमिपुत्र शेतकरी संघटना, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश मोर्चा, अन्याय निवारण व निर्मुलन समिती, भैरवनाथ ग्रामविकास ट्रस्ट यांचे आभार बचाव समितीने व्यक्त केले आहेत. आंदोलन स्थगित झाल्याची माहिती पारनेर समितीचे अध्यक्ष रामदास घावटे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश सचिव किरण वाबळे, बबन कवाद, साहेबराव मोरे, भानुदास साळवे, भाऊसाहेब खेडेकर जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, अविनाश देशमुख, माजी चेअरमन संजय भोर, पारनेर तालुका कार्याध्यक्ष संजय भोर यांनी दिली आहे.
काळे झेंडे दाखवण्याचा दिला होता इशारा
पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने करत याबाबत कारखाना बचाव समितीने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. तसेच पवारांना लिहिलेल्या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकूण 25 प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांचा खुलासा दौर्यापूर्वी पवारांनी करावा असं या पत्रात म्हटलं आहे. या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न दिल्यास पवारांच्या दौर्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल असा इशारा कारखाना बचाव समितीकडून देण्यात आला होता.
नेमका काय आहे आरोप
पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाने विक्री करून शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे माजी खासदार विदुरा नवले यांनी तो बळकावल्याचा कारखाना बचाव समितीचा आरोप आहे. पारनेर विकत घेणारी क्रांती शुगर कंपनीने गेल्या 7 ते 8 वर्षांपासून उसाला सर्वात कमी भाव देवून पारनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे समितीचे म्हणणं आहे.
तसंच, पारनेर कारखान्याच्या उर्वरीत मालमत्ता हडपण्यावर त्यांचा डोळा आहे. पारनेर कारखाना विक्रीतून उरलेली रक्कम, दीडशे एकर संपादित जमिनीचा मोबदला पारनेरला मिळू दिला जात नाही. पोलिसांकडून न्यायालयात खोटा चौकशी अहवाल सादर करणे, शासनाकडील दाखल असलेला पुर्नजीवन प्रस्ताव मंजूर करण्यास हस्तक्षेप करणे, प्रशासनाकडून अवसायक न हटवणे यामागेही पवारांचा हात असल्याचे बचाव समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे कारखाना बचाव समितीने त्यांना कारखाना कार्यक्षेत्रात येण्यास तीव्र विरोध दर्शवला होता.
