भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईवर मागील काही तासांपासून चक्रीवादळसदृश्य वारे घोंगावत असून हे वारे शहराच्या किनाऱपट्टी भागात धडकणार अशी भीत व्यक्त केली जात होती.
पण, आता मात्र हा धोका टळला असून, वादळानं दिशा बदलल्याची माहिती स्पष्ट होत आहे.
सध्याच्या घडीला अरबी समुद्रामध्ये चक्राकार वादळांची निर्मिती झालेली असली तरीही त्याचं रुपांतर पूर्णपणे चक्रीवादळात झालेलं नाही. असं असलं तरीही भारताला या वादळाचा फारसा धोका पोहोचणार नसून ते ओमान आणि येमेनच्या दिशेनं पुढे जाताना दिसत आहे.
अरबी समुद्रामध्ये तयार होणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं निर्माण होणारी चक्रीवादळाची परिस्थिती पाहता अशा प्रकारची वादळं मान्सूनच्या मोसमानंतर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होतात.
भारतात मान्सून साधारणत: जून ते सप्टेंबरदरम्यान असतो, तर मान्सूननंतर सुरु होणारं वादळांचं सत्र ऑक्टोबर ते डिसेंबर या काळापुरता सीमीत असतं.
