Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून दु:ख व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बाबा महाराज सातारकरांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
साईनगरी शिर्डी इथं विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बाबा महाराज सातारकर यांच्याबद्दल बोलताना मोदी भावूक झाले.
‘आज सकाळीच मला ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. मोदींनी बाबा महाराजांचं उल्लेख देशातील एक अनमोल रत्न व वारकरी संप्रदायाचं वैभव असा केला. ‘बाबा महाराजांनी कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून समाज जागृतीचं जे काम केलं, ते येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असं मोदी म्हणाले.
‘बाबा महाराजांची संवाद साधण्याची सोपी पद्धत, त्यांची प्रेमळ वाणी, त्यांची खास शैली लोकांचं मन मोहून टाकायची. त्यांच्या वाणीतून येणाऱ्या ‘जय जय रामकृष्ण हरी’ या भजनाचा अद्भुत प्रभाव काय होता याची मला कल्पना आहे. मी बाबा महाराज सातारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
