राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मैदानात उतरले आहेत. शनिवारी त्यांनी तेलंगणामधील हैदराबाद येथे एका सभेला संबोधित केले. मडिगा आरक्षण पोराटा समितीद्वारे (एमआरपीएस) ही सभा आयोजित करण्यात आली होती.
मडिगा समाज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील अनुसुचित जातीचा भाग आहे. मडिगा समाजाला सशक्त करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एका समितीची स्थापना करणार असल्याची घोषणा मोदींनी सभेमध्ये केली. यावेळी मंचावर एक वेगळेच चित्र पहायला मिळाले.
मंचावर उपस्थित आरक्षण सघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मंदाकृष्णा मडिगा भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडिगा यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या खांद्यावर थाप मारत मिठी मारली. यावेळी मंदाकृष्णा मडिगा हे देखील एखाद्या लहान मुलाप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्या खांद्यावर डोके ठेऊन ढसाढसा रडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदाकृष्णा मडिगा यांना छोटा भाऊ संबोधले. यावेळी त्यांनी मडिगा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्यासोब उभे आहोत, असेही मोदी म्हणाले. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी इतिहासामध्ये मडिगा समाजाला आश्वासन दिले, मात्र ते पूर्ण केले नाही. मी त्यांच्या पापांबद्दल क्षमा मागतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.
