निलेश लंके यांच सुजय विखेंना सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले…..

अहमदनगर : काही लोक आपण 50 वर्षांपासून राजकारण करत असल्याचं सांगतात, पण 50 वर्षांपूर्वी लोकांना दिलेलं आश्वासन आजही देत आहेत, असा कुठे नेता असतो का? असं सनसनीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke) यांनी भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांना (Sujay Vikhe Patil) दिलं आहे. दिवाळीच्या फराळ कार्यक्रमावरून सुजय विखेंनी निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.

राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळावरून भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता बोचरी टीका केली होती. दिवाळी फराळ खाऊ घातल्याने कोणी लोकनेता होऊ शकत नाही, तसे असते तर प्रत्येक तालुक्याचा आमदार हा हलवाई झाला असता असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

यावर आता आमदार निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, काही नेते आपण पन्नास वर्षांपासून जिल्ह्याचं राजकारण करत असल्याचं सांगत आहेत. मात्र काही ज्येष्ठ लोक आम्हाला सांगतात की, गेल्या पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी दिलेले आश्वासन अजूनही देत आहेत. असा नेता कुठे असतो का?

सध्या राज्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप एकत्र सत्तेत आहेत, मात्र त्यांच्या आमदार, खासदारांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू असल्याचं यातून समोर आले आहे. आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे हे जरी राज्यातील महायुतीत एकत्रित असले तरी स्थानिक पातळीवर दोघांमधला संघर्ष सुरूच आहे.

Leave a Comment