पारनेर : एकीकडे दुष्काळाचे सावट असणार्या पारनेर तालुक्याला रविवारी दुपारनंतर वादळी वार्यासह आलेल्या आवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावली.
यावेळी तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करत पिकवलेला कांदा, चारा पिके, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या.
दरम्यान, रविवारी दिवसभर नगर शहर आणि परिसारात ढगाळ वातावरण होते. पावसाळ्याप्रमाणे आभाळ भरून आले होते. दुपारी 4 च्या सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या भूरभूर पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन गारठून गेले होते. दुसरीकडे पारनेर तालुक्यात शनिवारी रात्री हलक्या स्वरुपात पाऊस झाला.
त्यानंतर रविवारी दुपारनंतर तालुक्यातील काही भागात जोरदार वादळी वारे वाहू लागले. अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी दुपारी तीन साडेतीननंतर पावसास सुरुवात झाली. यात अनेक ठिकाणी जोराच्या वार्यासह मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. यात द्राक्ष पिकासह कांदा पिकाचे सर्वधिक नुकसान झाले असुन तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती आली आहे.
तालुक्यातील जवळा, पानोली, राळेगण थेरपाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने द्राक्ष, केळी पिकासह इतर सर्वच शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. बहूतांश ठिकाणी ज्वारी, मका पिके भूईसपाट झाली.
जवळा, निघोज, राळेगण थेरपाळ या बागायत पट्टात अनेक फळपिकाचे नुकसान झाले असुन तालुक्यातील अनेक भागात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह पारनेर शहर परिसर, सुपा, वाडेगव्हाण अशा पश्चिम पट्ट्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे.
