शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल आता कोणत्याही क्षणी स्पष्ट होऊ शकतो. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. 20 डिसेंबर 2023 रोजी ही सुनावणी संपली.
या प्रकरणात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली आहेत. तसंच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलिप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अध्यक्षांना या प्रकरणाचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत घ्यायचा आहे. यामुळे आजपासून पुढील 48 तासांच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अनेक संभाव्य निर्णयांची चर्चा सध्या सुरू आहे.
यात पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या 40 आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं किंवा शिवसेनेत फूट पडलीच नाही केवळ नेतृत्त्वात बदल झाला असं सांगत दोन्हीपैकी एकाही गटाचे आमदार अपात्र ठरणार नाहीत असाही निकाल समोर येऊ शकतो असं जाणकार सांगतात.
परंतु यात जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याचा निकाल आल्यास विद्यमान सरकार धोक्यात येऊ शकतं का? किंवा या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार अस्थिर होऊ शकतं का? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
