मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम महाराष्ट्रात वाजायला सुरुवात झाली आहे. याची चाहूल लागतेय ती आहे त्या पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात जाण्याने. अशातच काही नेते दावे प्रतिदावे करत असतानाच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार गटातीलच अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
14 जानेवारी रोजी मुंबई काँग्रेसच नेते तथा माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी काही नेत्यांची यादीच जाहीर केली. यामध्ये त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही.
मात्र, काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये येणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार गटातील सहा ते सात मोठे नेते अजित पवारांच्या गटात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांच्या या दाव्यानंतर आमराद रोहित पवारांनी प्रतिदावा केला असून, ते म्हणाले की, अजित पवार गटाचेच काही नेते भाजपच्या संपर्कात आहेतच, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे नेते राहतील का? हे पहावं लागणार आहे. त्यांच्यातील बहुतांश लोकांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल असाही टोला आमदार रोहित पवारांनी यावेळी लगावला.
