ब्रेकिंग! संगमनेरचा भोंदू अखेर गजाआड

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’ मठाचा चालक भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्या अघोरी कृत्यांचा अखेर पर्दाफाश झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गडगे महाराज आणि त्याच्या सहकाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायदा आणि फसवणुकीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

राजेंद्र गडगे हा गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव पान परिसरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत होता. कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्राने बरे करणे, निपुत्रिक महिलांना मूल होण्याचे आमिष दाखवणे आणि घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली तो भाविकांकडून ११ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंत रकमा उकळत असे. विज्ञानाने हात टेकलेल्या आजारांवर मंत्रांच्या साह्याने उपचार करण्याचा दावा करून त्याने अनेक रुग्णांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र बापू गडगे याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शेंडे आणि मधुकर शिंदे अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी मुख्य आरोपी गडगे आणि मधुकर शिंदे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्या १० वर्षांपासून हा भोंदूगिरीचा प्रकार उघडपणे सुरू असतानाही पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. इतकेच नव्हे तर, काही पोलिसांनी या महाराजाला संरक्षण दिल्याचेही आरोप होत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे करत आहेत.

Leave a Comment