पुणे हादरले! भाजप नेत्याने केली महिलेची हत्या 

पुण्यात कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका ३९ वर्षीय महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना पुण्यातील चंदननगर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांत वकील, त्याची पत्नी आणि मुलगी या तिघा आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा भाजपचा कायदे विभागाचा अध्यक्ष आहे. पूनम दिनेश मून असे मृत महिलेचे नाव आहे, तर ॲड. संजय सावंत असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम मून आणि संजय सावंत यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंत यांच्या कुटुंबाला होता. याच संशयातून ॲड. सावंत याची पत्नी स्वाती आणि मुलीने संगनमत करून पूनमच्या हत्येचा कट रचला. चंदननगर येथील कार्यालयात आरोपींनी पूनम यांचे पाय दोरीने बांधून बॅटने आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या कटात वकील संजय सावंत याचाही सहभाग आहे.

याप्रकरणी पूनम यांचे पती दिनेश उद्धवराव मून यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संजय सावंत आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले. तर, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने स्वाती सावंत हिला ताब्यात घेतले. या तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment