एकीकडे इंडिया आघाडीतून लोकसभेसाठी बाहेर असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने केली आहे. त्यामुळे, इंडिया आघाडी बनण्यापूर्वीच बिघडताना दिसून येत आहे.
त्यातच, बिहारमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पुन्हा एकदा भाजपासोबत संसार थाटणार असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय समिकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्य़ातच, आता काँग्रेसचेही १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त माध्यमांत झळकत आहे.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा शेवटचा अंक लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता असून जेडीयू-आरजेडी महाआघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होणार असून याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं समजते.
नितीश कुमार यांच्या एनडीए प्रवेशात सध्या बिहारमध्ये सत्तेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची कोंडी होईल. त्यामुळे, लालू प्रसाद यादवही ऐनवेळी अनोखा डाव टाकत भाजप आणि जेडीयूला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. पण, आता काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे समजते.
