शिवसेनेच्या दोन आमदारांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन या दोन्ही आमदारांची भेट घेतली आहे.
शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज या दोन्ही आमदारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सदा सरवणकर यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक बिघडल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे प्लेटलेट्स काऊंट कमी होऊन त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होऊ लागला, त्यामुळे त्याना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
तर आमदार संजय शिरसाट यांच्या मानेला गाठ झाल्याने त्यांना त्यावर उपचार करण्यासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोघांच्या प्रकृतीची चौकशी करून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्याना धीर दिला.
