आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्याप्रमाणावर फुटतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला.
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली होती.
परंतु, येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या गोटात यापेक्षा मोठा भूकंप होईल, असे मिटकरी यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अमोल मिटकरी यांनी राजकीय भूकंपाच्या शक्यतेबाबत वाच्यता करताना खळबळजनक माहिती दिली. काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी अजित पवारांची भेटही घेतली आहे.
यामध्ये काँग्रेसच्या ७ तर शरद पवार गटाच्या ५ आमदारांचा समावेश असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरवावा.
पण त्याचा फायदा होणार नाही. अनिल तटकरे येऊ देत किंवा कोणी युगेंद्र-जोगेंद्र येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
