पिंपळगाव खांडच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार, साकूरला सोमवारी शेतकऱ्यांची जाहीर बैठक

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) संगमनेर, पारनेर तालुक्यातील पठारावरील मुळानदी काठच्या गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली असल्याने यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवणार असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यासाठी पिंपळगाव खांड घरणातून शिंदोंडीपर्यंत आवर्तन सोडावे या मागणीसाठी साकूर येथील ग्रामसचिवालयात सोमवार दि. ४ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता साकूर पठार मुळा पाणी संघर्ष समितीच्यावतीने जाहीर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुन्हा पिंपळगाव खांड धरणाच्या पाणी आंदोलन संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी पठार भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, २०१६ सालीही याच विषयावर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता आहे.

संगमनेर तालुक्यातील साकूर, बिरेवाडी, मांडवे बु, शिंदोडी, कौठेमलकापूर, शेळकेवाडी, दरेवाडी, रणखांब, खंडेरायवाडी, पिंपळगाव देपा, जांबूत खु, जांबूत बु. हिवरगाव पठार, शेंडेवाडी, तास्करवाडी, चिचेवाडी, हिरेवाडी, तर पारनेर तालुक्यातील मांडवे खु, देसवडे, टेकडवाडी, काळेवाडी, पोखरी, खडकवाडी आदी गावे मुळा नदीवर अवलंबून आहेत.

ही सर्व गावे मुळा नदीच्या काठालगत आहेत. नदीला जेव्हा पाणी असेल तेव्हाच पाण्याची सोय होते. परंतु सद्यस्थितीत नदी काठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा पाऊस खूप कमी पडला आहे.

पाण्याची टंचाईचा परिणामही या गावांना जाणवत आहे. पठार भागातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना देखील दिवसाआड चालत असल्याने पुढील दिवस हलाखीचे बनणार आहेत.

Leave a Comment