पाणी प्रश्न पेटला, शेतकऱ्यांचा नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको, साकूर येथील बैठकीत मोठा निर्णय

साकूर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठावरील गावांमध्ये पिण्याची पाण्याची भीषण टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. जांबुत ते शिंदोडीपर्यंतचे केटीवेअर कोरडे ठाक पडल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

त्यासाठी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडीपर्यंत सोडण्यात यावे या मागणीसाठी जांबुतचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी १ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. उपोषणाला चार दिवस उलटून गेल्याने उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांची प्रकृती खालावली आहे. तसेच त्यांच्या उपोषणाची शासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठच्या गावांमधील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी तातडीने संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठच्या गावांमधील शेतकऱ्यांची साकूर येथे पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावली होती. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नांवर अतिशय गांभीर्याने चर्चा बैठकीत करण्यात आली.

शासनाने या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही तर गुरूवार दि. ७ मार्च २०२४ रोजी एकोणीस मैलावरील नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णयच या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच पेटणार आहे.

या बैठकीसाठी एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, संतोष वाडेकर, भाऊसाहेब डोलनर, दादा पटेल, सुदाम सागर, मिरा शेटे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

तसेच या बैठकीत उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांना १५ ते २० गावांनी एकमुखी पाठिंबा दिलाय. तसेच उपोषणस्थळी प्रत्येक गावाने दररोज जाऊन पाठिंबा देण्याचे ठरले. यावेळी कृती समितीची देखील स्थापना करण्यात आलीय. तसेच हक्काच्या पाण्यासाठी थेट हायकोर्टात जाण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आलाय.

दरम्यान, २०१६ व २०१९ साली पिंपळगाव खांड धरणाचे पाणी शिंदोडीपर्यंत मिळण्यासाठी संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. गेल्या ८ वर्षांपासून पाण्यासाठी लढाई सुरू आहे. त्यामुळे पुन्हा याच विषयावर शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

या बैठकीसाठी संगमनेर तालुक्यातील साकूर, बिरेवाडी, मांडवे बु, शिंदोडी, कौठेमलकापूर, शेळकेवाडी, दरेवाडी, रणखांब, खंडेरायवाडी, पिंपळगाव देपा, जांबूत खु, जांबूत बु. हिवरगाव पठार, शेंडेवाडी, तास्करवाडी, चिंचेवाडी, हिरेवाडी, तसेच पारनेर तालुक्यातील मांडवे खु, देसवडे, टेकडवाडी, काळेवाडी, पोखरी, खडकवाडी आदि गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment