शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली. यावेळी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदारांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र जिल्ह्यातील उ बा ठा गटाचे एकमेव आमदार शंकरराव गडाख हे अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यानिमित्ताने महाविकास आघाडीत असणारी नाराजी पुन्हा एकदा समोर आली असल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.
शिर्डी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यानिमित्ताने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यामधून महाविकास आघाडीच्या आमदारांसह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, हेमंत ओगले, डॉ एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी,करण ससाने, शिवाजी नेहे, श्रीमती सुनीता भांगरे ,मधुकर तळपाडे ,शिवसेनेचे जगदीश चौधरी, आप्पासाहेब केसकर, सुधीर म्हस्के, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेवासे येथिल एकमेव आमदार शंकरराव गडाख हे गैरहजर राहिले. विशेष म्हणजे त्याच गटातील उमेदवार निवडणूक लढवत असताना देखील महत्वाच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली नसल्याने मतदार संघात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काही मतभेद असल्याचे मत मतदारांनी व्यक्त केले असून त्यामुळेच पत्रकारांना या बैठकीचे शूटिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. एकंदरीतच गडाख यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर येणाऱ्या आगामी काळात गडाख हे भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रचार करणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
