संगमनेर : मोटारसायकल आणि कंटेनरमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. यात दोघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात निमोण गावच्या शिवारात लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर घडला. अपघातातील दोघे मयत नाशिक जिल्ह्यातील तर एक जण अकोले तालुक्यातील आहे.
कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३०), युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९, दोघेही रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि संदीप संतोष आगिवले (रा. गर्दनी, ता. अकोले) अशी मयतांची नावे आहेत.
कंटेनर (जी.जे. १५ ए. व्ही ६६५६) आणि पल्सर मोटारसायकल यांच्यात धडक झाली होती. यात नाशिक जिल्ह्यातील कुंडलिक मेंगाळ आणि युवराज मेंगाळ हे जागीच मयत झाले. आगिवले यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नांदूरशिंगोटे (जि. नाशिक) येथील दोन्ही युवक हे अंत्यत गरीब कुटुंबातील असून ते विवाहित आहेत. कुंडलिक मेंगाळ हा नांदूरशिंगोटे व दोडी उपबाजारात माथाडी कामगार तर युवराज मेंगाळ हा शेती व मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
