सोलापूर : हे टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटं आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर निशाणा साधला.
आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी टरबूजाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “देवेंद्र फडणवीसांचे काय करायचे हे तुम्हाला माहीत आहे. पण टरबूज हे उन्हाळ्यात कामी येतं. पण हे दुष्काळात तेरावा महिना आहे. हे (देवेंद्र फडणवीस) टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटं आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
