मैत्रीणीला वाचवताना दोन सख्ख्या बहिणींसह तिघींचा बुडून मृत्यू 

नांदेड (Nanded) जिल्ह्यातून आणखी एका दुर्दैवी घटना समोर आली आहे. किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात (Drown) बुडून 3 युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (12 वर्षे,) पायल देविदास कांबळे (16 वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (19 वर्ष) रा.मारेगाव (खालचे) ता.किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किवटजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एकीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण्यात आले आहे. याप्रकरणी, घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मामीडवार हे करीत आहेत.

Leave a Comment